चालू वर्षीच्या मास्टरशेफर ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा त्यामधील स्पर्धकांमुळे गाजली आहे. सोशल मीडियावर या शोच्या छोटय़ा-छोटय़ा क्लिप्स प्रचंड व्हायरल झाल्याने ऑस्ट्रेलियासह भारतातही याचा विजेता कोण होणार याची उत्सुकता होती. स्पर्धेत दमदार कामगिरी करत जस्टिनने शोचे विजेतेपद पटकाविले आहे. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन 13 चा विजेता जस्टिन नारायण हा भारतीय वंशाचा आहे. यापूर्वी 2018 मध्ये साशी चेलिहा या भारतीय वंशाच्या स्पर्धकाने हा शो जिंकला होता.
27 वर्षांचा नारायणने शोमध्ये चिकन करी, लोणचे कोशिंबिर, इंडियन चिकन टाकोज, चारकोल चिकन विथ टॉम आणि फ्लॅटब्रेड अशा अनेक भारतीय खाद्यपदार्थांद्वारे परीक्षकांवर प्रभाव पाडला होता. जस्टिनने वयाच्या 13 व्या वर्षी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती. जस्टिनची आई ही त्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे. भारतीय खाद्यपदार्थ असणारे रेस्टॉरंट उघडण्याचे जस्टिनचे स्वप्न आहे. या रेस्टॉरंटमधून कमावलेल्या पैशातील काही हिस्सा त्याला भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा आहे.
भारतीय पाककृतींचा तडका मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी कुकिंगची स्पर्धा आहे. ही स्पर्धा मागील 13 वर्षांपासून सुरू आहे. या शोमधून अनेक दिग्गज शेफ जगाला मिळाले आहेत. यातील अनेकांची स्वतःची मोठी रेस्टॉरंट्सही आहेत.