वृत्तसंस्था/ टोकियो
23 जुलैपासून येथे सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताच्या नौकानयन संघाचे मंगळवारी आगमन झाले आहे. टोकियोतील हनेदा विमानतळावर भारतीय नौकानयन संघ दाखल झाला.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नौकानयन या क्रीडाप्रकारात सहभागी होणाऱया भारतीय संघामध्ये वरूण ठक्कर, गणपती चेंगाप्पा, विष्णू सर्वानन आणि नेत्रा कुमानन यांचा समावेश आहे. नौकानयन प्रकारातील लेसर रॅडियलमध्ये कुमानन भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. विष्णू सर्वानन लेसर स्टँडर्ड क्लास तसेच वरूण ठक्कर आणि गणपती चेंगाप्पा 49 ईआर क्लासमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील नौकानयन प्रकाराला 25 जुलैपासून प्रारंभ होईल. भारतीय ऑलिंपिक इतिहासामध्ये प्रथमच यावेळी भारताचे चार स्पर्धक नौकानयन प्रकारात सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी नेत्राला स्पेनमध्ये तसेच ठक्कर आणि गणपती यांना पोर्तुगालमध्ये, सर्वाननला माल्टामध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.t