वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
28 जुलैपासून सुरु होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय मुष्टियुद्ध संघ रविवारी जॉर्डन्स टाऊनला रवाना झाला. भारतीय मुष्टियुद्ध संघाला 14 दिवसांसाठी सराव प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
भारतीय महिला मुष्टियुद्ध संघामध्ये विश्वविजेती निखत झरीनचा समावेश आहे. पुरुष विभागात अमित पांघलसह अन्य मुष्टियोद्धे या सराव शिबिरात दाखल होणार आहेत. भारतीय मुष्टियुद्ध संघामध्ये महिला विभागात टोकियो ऑलिंपिक कास्य पदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन, नितू, जस्मिन तसेच प्रशिक्षक भास्कर चंद्रा भट, प्रणामिका बोरा, महावीर सिंग यांचा समावेश आहे. पुरुषांच्या विभागात 8 मुष्टियोद्धे असून त्यामध्ये हुसामुद्दिन मोहम्मद, शिवा थापा, रोहित टोकास, सुमित, आशिषकुमार, संजित, सागर आणि अमित पांघल यांचा समावेश आहे. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.