न्यूझीलंड अ संघाचा मालिकाविजय, चॅपमनचे नाबाद शतक
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
इशान किशनच्या नाबाद 71 धावांच्या संघर्षमय खेळीनंतरही भारत अ संघाला निर्णायक तिसऱया वनडे लढतीत न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 5 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. मालिकाविजयासाठी 271 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात भारताला 7 धावांची गरज होती व दोन गडी बाकी होते. मात्र, पहिला चेंडू निर्धाव खेळून काढल्यानंतर किशनने दुसऱया चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि याचाच भारताला फटका बसला.
जलद गोलंदाज काईल जेमीसनने (4-49) यावेळी संदीप वॉरियर व ईशान पोरेल यांना लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करत न्यूझीलंड अ संघाला विजय संपादन करुन दिला. त्यापूर्वी, 49 व्या षटकात जम बसलेला अक्षर पटेल (32) व राहुल चहर (0) हे डावखुरा फिरकीपटू अजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाले होते.
भारताने या लढतीत पृथ्वी शॉ (55) व ऋतुराज गायकवाड (44) यांच्या फटकेबाजीमुळे 79 धावांची सलामी नोंदवली. कर्णधार मयांक अगरवालने (22) उत्तम सुरुवात केली. मात्र, याचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही. सुर्यकुमार यादव (5) व विजय शंकर (19) देखील स्वस्तात बाद झाले. न्यूझीलंड अ संघातर्फे अजाज पटेल (3-44) व रचित रविंद्र (2-43) यांनी भारतीय संघाच्या मध्य व तळाच्या फळीला सातत्याने धक्के दिले.
मार्क चॅपमनचे शतक
फलंदाजीत मार्क चॅपमनची नाबाद 110 धावांची खेळी न्यूझीलंड अ संघासाठी निर्णायक ठरली. भारताने एकवेळ अ संघाला 4 बाद 68 व नंतर 6 बाद 105 असे रोखून धरले होते. पण, चॅपमन व टॉड ऍस्ले (56) यांनी सातव्या गडय़ासाठी 136 धावांची भागीदारी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोन्ही संघात आता दि. 30 जानेवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होईल.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड अ : 50 षटकात 7-270 (मार्क चॅपमन 98 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह 110, टॉड ऍस्ले 65 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 56, ब्लंडेल 37, ग्रँट फिलीप्स 35. अवांतर 10. ईशान पोरेल 10 षटकात 3-64), भारत अ : 49.4 षटकांत सर्व बाद 265 : पृथ्वी शॉ 38 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 55, आर. गायकवाड 66 चेंडूत 6 चौकारांसह 44, मयांक अगरवाल 22 (32 चेंडूत 2 चौकार), इशान किशन 71 (84 चेंडूत 8 चौकार), विजय शंकर 19, अक्षर पटेल 32 (28 चेंडूत 2 चौकार), अवांतर 8. गोलंदाजी : केए जेमीसन 4-49, अजाज पटेल 3-44, रचित रवींद्र 2-43, टॉड ऍसल 1-37).