भारतीय संघ ‘परतफेड’ करण्यास सज्ज, शाहीन आफ्रिदी, फलंदाजी पाकची जमेची बाजू
वृत्तसंस्था/ मेलबर्न
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांतील सुपर 12 फेरीतील ‘संडे ब्लॉकबस्टर’ लढत येथील एमसीजीवर आज होणार असून दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आजवर आयसीसीने आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धांत भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानला नमविले आहे. मात्र मागील टी-20 विश्वचषकात भारताला पाककडून प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाने हर्ट झालेला भारतीय संघ हाय क्वालिटी पाक संघाला त्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानेच रविवारी मैदानात उतरणार आहे.
या लढतीवर पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता असून कमी षटकांचा सामना होण्याची अपेक्षा असल्याचे हवामानाच्या जाणकारांकडून सांगण्यात आले. ‘हाऊसफुल्ल’ झालेल्या या लढतीसाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी होणार असून दोन्ही कर्णधारांवर त्यांच्या चाहत्यांचा पूर्ण विश्वास आहे. या दोन संघांतील लढतीला नेहमीच ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ असल्याचे मानण्यात येते. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसी स्पर्धांत एकदाही पाककडून पराभव स्वीकारावा लागला नाही. मात्र क्रिकेट मैदानावर ‘बदला’ या शब्दाला काहीच महत्त्व नसल्याचे तो म्हणत असे.
गेल्या वर्षभरात मात्र बरेच बदल झाले असून मागील वर्षी शाहीन शाह आफ्रिदीच्या भेदक वेगवान माऱयाच्या जोरावर पाकिस्तानने आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतावर पहिला विजय मिळविला. शाहीन आफ्रिदीने 31 धावांत 3 बळी मिळवित या विजयात मोलाचा वाटा उचलताना काही नामवंत फलंदाजांच्या इगोवरही आघात केला होता. रोहित, विराट कोहली किंवा केएल राहुल दुबईत मागील वर्षी झालेला मानहानिकारक पराभव निश्चितच विसरलेले नाहीत. मात्र भारतीय संघ अलीकडच्या काळात पूर्णपणे मजबूत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात, चाहत्यांना वाटत असले तरी भारताला फेव्हरिट मानले जात नाही. याशिवाय बीसीसीआयने पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱया आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकमध्ये पाठवणार नसल्याचे म्हटल्यानंतर पाकनेही पुढील वर्षी भारतात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यामुळे वातावरण राजकीयदृष्टय़ा अधिकच तापले आहे. भारताला या लढतीसाठी अंडरडॉग्स म्हणवून घेणे आवडेल, मात्र पाकला अपेक्षापूर्ती करण्याच्या दडपणाचे आव्हान पेलावे लागणार आहे.
भारतासमोर समस्या
भारतासाठी काही कालावधीपासून निश्चित कॉम्बिनेशन नसणे ही मुख्य समस्या होऊन बसली आहे. वर्ल्डकपच्या दोन वर्षे आधी 2019 मध्ये त्यांच्याकडे चौथ्या क्रमांकाचा फलंदाजही निश्चित झाला नव्हता. आणि आता एक वर्षानंतर जादा गोलंदाजाला संघात सामावून घेण्यासाठी त्यांना एका स्पेशालिस्ट डावखुऱया फलंदाजाला (रिषभ पंत) वगळावे लागू शकते. पंतच्या गैरहजेरीत फलंदाजीत उजवेच फलंदाज असल्यामुळे शाहीन, नसीम शाह, हॅरिस रौफ यांना एका लाईनवर गोलंदाजी करणे सोपे जाणार आहे. पॉवरप्लेमध्ये आपले अव्वल तीन फलंदाज शाहीनला कसे हाताळतात, त्यावर सामन्याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. फक्त भारताचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवच शाहीनवर हल्ला करण्याची शक्यता आहे. परिस्थिती व वातावरण कसेही असले तरी तो आपल्या फलंदाजीचा टेम्पो बदलत नाही. नाणेफेकीचा कौल रोहितच्या बाजूने लागल्यास तो धावांचा पाठलाग करणे पसंत करेल.
पाऊस असेल आणि तापमान खाली आल्यास वातावरण सीम गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल, त्यामुळे तीन स्पिनर्सपैकी एकाला संघात स्थान दिले जाईल. पाककडे तीन डावखुरे फलंदाज असल्याने ऑफस्पिनर आर. अश्विनला संधी मिळू शकते. आशिया चषक सुपर 4 सामन्यात पाकने नवाझला बढती दिली, त्यावेळी भारतीय संघ गाफील राहिला होता. पण यावेळी भारताने पूर्ण अभ्यास केलेला असणार. शाहीन आफ्रिदी बहरात असल्याने या सामन्यात पाकची बाजू किंचित वरचढ ठरणारी आहे.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), राहुल, कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, चहल, अक्षर पटेल, आर. अश्विन, शमी, भुवनेश्वर, अर्शदीप, हर्षल पटेल, दीपक हुडा.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, शान मसूद, मोहम्मद नवाझ, खुशदिल शाह, असिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अली, हॅरिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वासिम, शदाब खान, मोहम्मद हसनैन.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
37 वर्षांनी एमसीजीवर लढत
एमसीजीवर 37 वर्षांनी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत होत आहे. 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत या दोन संघांत अंतिम लढत झाली होती आणि त्यात सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवून जेतेपद पटकावले होते. त्या लढतीला जेमतेम 30000 प्रेक्षक उपस्थित होते. त्यावेळी ‘वर्ल्ड कप फायनल ः ट्राम कंडक्टर्स वि. बस ड्रायव्हर्स’ अशा अर्थाचे पोस्टर प्रदर्शित करीत एक प्रकारे या दोन संघांची अवहेलनाच केली होती. पण याच संघांतील भविष्यातील लढती प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देणाऱया ठरतील, असे त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते.
आजचे सामने (सुपर 12 फेरी)
1) लंका वि. आयर्लंड
स्थळ ः होबार्ट, वेळ ः सकाळी 9.30
2) भारत वि. पाकिस्तान
स्थळ ः पर्थ, वेळ ः दु. 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
टी-20 वर्ल्ड कपमधील दोन्ही संघांची कामगिरी
सामने 6
भारत विजयी 5
पाक विजयी 1