डॉ. विजय व अभिमन्यू पाटील यांची माहिती
इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलची निवड : 26 हॉस्पिटलचा समावेश
प्रतिनिधी / इस्लामपूर
हैदराबादच्या भारत बायोटेकने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी देशातील 26 अग्रगण्य मेडिकल हॉस्पिटलची निवड केली असून यामध्ये इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची निवड झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये लसीकरणाचा शुभारंभ रविवार 27 रोजी होणार आहे, अशी माहिती प्रकाश इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील व डॉ. अभिमन्यू पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी यांच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली. भारत बायोटेकने दोन चाचण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत. ही लस संपूर्ण सुरक्षित असून कोरोना प्रतिबंधासाठी तिसऱ्या चाचणीसाठी प्रकाश हॉस्पिटलची निवड केली आहे. ही प्रकाश हॉस्पिटल व इस्लामपूरच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. लस दिल्यानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. ही प्रतिकारशक्ती 12 महिने राहिल असे अनुमान आहे.
प्रकाश हॉस्पिटलसाठी 1 हजार डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ही लस पूर्णतः मोफत असून त्यापुढे गरज पडल्यास लस उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठीच्या आयसीएम, औषध नियंत्रण विभाग यांच्या सर्व परवानगी मिळाल्या आहेत. या लसीकरणाचा शुभारंभ रविवार 27 रोजी अकरा वाजता माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात ही लस एक माजी सैनिक, दोन शेतकरी, डॉक्टर यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, मधुकर हुबाले, विकास पाटील, भास्कर कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, वाहीद मुजावर उपस्थित होते.