प्रतिनिधी / सातारा :
वाई तालुक्यातील भुईंज येथील कृष्णा नदीच्या पुलाखाली दि. 26 रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास 55 ते 60 वर्षाचा अनोळखी मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यानंतर त्या व्यक्तीचा खून गळा आवळून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहावर असलेल्या शर्टच्या कॉलरवर आतील बाजूस बॉलपेनने मोहिते असे लिहिलेले आहे. त्यावरुन खून झालेली व्यक्ती कोण?, त्यांचा कोणी खून केला असावा याचा शोध भुईंज पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज येथील कृष्णा नदीच्या पात्रात पुलाखालील दि. 26 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी 55 ते 60 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिकांनी त्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्याकरता भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत पाटील यांनी पोस्टमार्टम केले असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गळा दाबून श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात व्यक्तींचा खून केल्याचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे वर्णन रंग काळा सावळा, शरीरयृष्टी मजबूत, नाक सरळ, चेहरा उभट, थोडे टक्कल व पांढरे केस, अंगात पांढऱया रंगाचा तीन बटणी फुल बाह्याचा शर्ट असून त्याच्या कॉलवर बॉलपेनने मोहिते असे लिहले आहे. पांढऱया रंगाचा पायजमा, फुल बाह्याचे बनियन, निळय़ा रंगाची अंडरवीअर, निळय़ा रंगाचा रुमाल, गळय़ात काळय़ा रंगाचा गोफ, काळपट मास्क आणि काळपट रंगाचे बुट असे वर्णन असून त्या व्यक्तीचा कोणी खून केला असावा, खून झालेला व्यक्ती कोण असावा याचा पोलीस शोध घेत आहेत. भुईंज गावामध्ये सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्हीत तरी ही खून झालेली व्यक्ती आलेली आहे काय?, मारेकरी कोण असेल याचा तपास भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.