मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून कमरेच्या दुखापतीमुळे बाहेर पडला असून हा सनरायजर्स हैदराबादसाठी मोठा धक्का ठरला आहे. शुक्रवारी दुबईत चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध झालेल्या लढतीदरम्यान भुवनेश्वरला दुखापत झाली होती. भुवी उर्वरित आयपीएल हंगामात खेळू शकणार नसल्याचे सूत्रांनी यावेळी स्पष्ट केले.
‘भुवनेश्वरची दुखापत किरकोळ स्वरुपाची अजिबात नाही. त्यामुळे, त्याला उर्वरित हंगामात खेळता येणार नाही. सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजीचे नेतृत्व त्याच्याकडे होते. तोच आघाडीचा, अव्वल गोलंदाज होता. आता तोच उपलब्ध नसल्याने संघाला बऱयाच समस्यांना सामोरे जावे लागेल. अगदी गोलंदाजी करत नसतानाही त्याच्यातील नेतृत्व गुणांचा संघाला लाभ होत होता. त्याचा अनुभव संघासाठी अतिशय लाभदायक होता’, असे सूत्राने भुवीच्या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट करताना सांगितले.
भुवनेश्वरला चेन्नईविरुद्ध लढतीत दुखापत झाली आणि डावातील 19 व्या षटकादरम्यान त्याला मैदान सोडाव लागले होते. सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मात्र भुवनेश्वरची दुखापत कितपत गंभीर आहे, याची आपल्याला अद्याप कोणतीही कल्पना नसल्याचे नमूद केले.
‘मी मैदानावर असताना भुवनेश्वरला अचानक बाहेर जावे लागले. भुवनेश्वरची दुखापत किती गंभीर आहे, याची मला फिजीआंsकडून माहिती घ्यावी लागेल. त्यानंतरच मला त्याबाबत काही सांगता येईल’, असे वॉर्नर म्हणाला. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीपूर्वी नाणेफेकीदरम्यान वॉर्नरने भुवनेश्वरला काही सामन्यात खेळता येऊ शकणार नाही, अशी चिंता व्यक्त केली होती. अर्थात, त्यानंतर दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले आणि भुवनेश्वर उर्वरित पूर्ण हंगामातच खेळू शकणार नसल्याचे सूत्राकडून नमूद केले गेले आहे.
या दुखापतीमधून भुवनेश्वर केव्हापर्यंत सावरु शकणार, हे देखील आता महत्त्वाचे असेल. आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर भारतीय संघ बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे. त्या मालिकेत 4 कसोटी सामने होतील. त्यानंतर मर्यादित षटकांची मालिकाही होणार आहे. त्यापूर्वी भुवनेश्वर निवडीसाठी उपलब्ध होईल का, हे नंतर स्पष्ट होऊ शकेल.