इंदोर / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील प्रसिद्ध संत भैयू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदोर येथील न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. न्यायालयाने सर्व्हिसमन विनायक, केअर टेकर पलक आणि वाहनचालक शरद यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सर्व दोषींना प्रत्येकी 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रसंत भैयू महाराज यांनी राहत्या घरी लायसन्स रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
भैयू महाराज आत्महत्याप्रकरणी 19 जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली. आरोपी विनायकच्यावतीने अधिवक्ता आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.
मागील साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असल्याचे युक्तिवादाअंती स्पष्ट झाले आहे. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैयू महाराजांचा सेवेदारांवर एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते. मात्र, पुढे विश्वासातील सेवेदारांनी त्यांना पैशासाठी भयंकर त्रास दिल्यामुळेच त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.