अवघ्या दहा महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
प्रतिनिधी / परुळे:
भोगवे-कोलवेळवाडी येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (23) हिचा वास्को-गोवा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात 24 डिसेंबरला झाला होता.
भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी गोवेरी-भगतवाडी येथील तेजस्विता उर्फ श्रद्धा जगन्नाथ पाटकर हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर तिचे नाव संचिता ठेवण्यात आले होते. गोवा येथे दोघे कामाला होते. 24 डिसेंबरला संचिता आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर जात होती. वास्को न्यू वाडा येथे दुचाकी आली असता, दुचाकीचा टायर पंक्चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली. यात दुभाजकाला आदळून तिच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. सचिन याने स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी हलविले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
करलकर, पाटकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
शुक्रवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती, सासू, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे करलकर व पाटकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.