वृत्तसंस्था/ मँचेस्टर
युरोपा लिग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबने शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले. गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने रियल सॉसिदादला गोलशून्य बरोबरीत रोखले. हा सामना अनिर्णित राहिल्याने मँचेस्टर युनायटेड संघाने स्पेनच्या रियल सॉसिदाद संघावर सरासरी 4-0 अशा गोलफरकाने विजय मिळवित शेवटच्या 16 संघातील आपले स्थान निश्चित केले.
गुरुवारच्या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. पण भक्कम गोलरक्षण आणि उभय संघांच्या बचावफळीची कामगिरी दर्जेदार झाल्याने शेवटपर्यंत गोल होऊ शकला नाही. सामन्यातील 13 व्या मिनिटाला रियल सॉसिदादने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमविली. मँचेस्टर युनायटेडच्या गोलरक्षकाने सॉसिदादच्या अनेक चढाया फोल ठरविल्या. आता मँचेस्टर युनायटेड संघाचा प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेतील चेल्सी संघाबरोबरचा सामना येत्या रविवारी होणार आहे.