गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप, रहीम स्टर्लिंगचे दुहेरी गोल
मँचेस्टर / वृत्तसंस्था
काहीच दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेल्या मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मात्र आपले आव्हान आणखी भरभक्कम करताना न्यू कॅसल युनायटेडचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. अन्य लढतीत अर्सेनलने घरच्या मैदानावर खेळताना लीड्स युनायटेड संघाला 2-1 अशा फरकाने मात दिली.
यापूर्वी चॅम्पियन्स लीगमधील उपांत्य लढतीत रियल माद्रिदकडून नाटय़मय पराभव पत्करावे लागलेल्या मँचेस्टर सिटीतर्फे रहीम स्टर्लिंगने दोन गोल केले. इतिहाद स्टेडियमवर झालेल्या या लढतीत एमरिक लॅपोर्टे, रॉड्री, फिल फोडेन यांनी अन्य तीन गोल नोंदवले. या विजयासह सिटीने 3 गुण संपादन करत आणखी एकदा अव्वलस्थान काबीज केले. लिव्हरपूलला शनिवारी टॉटनहॅम हॉटस्परविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागल्यानंतर ते खाली फेकले गेले.
दोन्ही संघांचे आणखी तीन सामने बाकी असून सिटीकडे चार गोलचा सुपेरियर गोल-डिफरन्स आहे. ‘लिव्हरपूल संघाशी असलेला फरक अगदीच कमी आहे आणि अखेरच्या टप्प्यात काहीही होऊ शकते. आजचा विजय आमच्यासाठी त्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा होता’, असे मॅनेजर पेप गॉर्डिओला म्हणाले.
सिटीतर्फे 19 व्या मिनिटाला स्टर्लिंगने पहिला गोल केला तर लॅपोर्टेने 38 व्या मिनिटाला संघाची आघाडी भक्कम केली. पुढे रॉड्रीने 61 व्या मिनिटाला तिसरा तर फिल फोडेनने 90 व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल नोंदवला. रहीमने जादा वेळेत तिसऱया मिनिटाला वैयक्तिक दुसरा व संघाचा पाचवा गोल केला. न्यू कॅसलची पाटी मात्र कोरीच राहिली.
वेस्ट हॅमची नॉर्विच सिटीवर मात
या स्पर्धेतील अन्य एका लढतीत वेस्ट हॅम युनायटेडने नॉर्विच सिटीचा 4-0 असा धक्कादायक पराभव करत मँचेस्टर युनायटेडवर दडपण आणले. वेस्ट हॅम युनायटेडतर्फे बेहरॅहमाने 12 व्या मिनिटाला पहिला तर पहिल्या सत्राअखेर जादा वेळेत तिसऱया मिनिटाला दुसरा गोल केला. याशिवाय, ऍन्टोनियोने 30 व्या तर मॅन्युएल लॅन्झिनीने 65 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचे अचूक वेध घेतले. यातील पहिल्या तीन गोलमध्ये बोव्हेनचे असिस्ट होते. नॉर्विचसाठी या हंगामात घरच्या मैदानावरील हा 12 वा पराभव ठरला.