इंजेव्हिनिटी या कंपनीने मंगळावर हेलिकॉप्टर सदृश यान उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाल्यास नवा इतिहास घडणार आहे. 11 किंवा 12 एप्रिलला या प्रयोगाचा प्रारंभ करण्यात येईल. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी किंवा त्यावेळी हवामान अनुकूल नसल्यास त्यानंतर तीन तासांनी नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून चाचणी सुरू होईल. भारतात ती रात्री एक वाजता दिसू शकेल. या चाचणीचे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे भारतीयांनाही ही चाचणी पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या हेलिकॉप्टरची अंतिम चाचणी सुरू असून हेलिकॉप्टरचा रोटर व्यवस्थित फिरतो की नाही, हे तपासण्यात येत आहे. तसेच त्याचा वेग आणि समतोल यांची सांगड घालण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मानवाची मंगळयात्रा अधिक वेगवान आणि जास्त सुलभ होणार आहे.
आतापर्यंतचे प्रयोग अतिशय यशस्वी झाले असल्यामुळे संशोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हेलिकॉप्टरचे सर्व भाग आणि कार्ये अगदी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. नासाने या प्रयोगांची माहिती देण्यासाठी प्रश्नोत्तरांचा एक कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या शंका तसेच काही जणांकडून घेतले जाणारे आक्षेप यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चाचणी लाईव्ह दाखविली जाणार असल्याने झूम कॅमेरे इत्यादी सामग्री सज्ज करण्यात येत असून जगातील किमान 300 कोटी लोक ‘याची देही याची डोळा’ हा अनुभव घेऊ शकणार आहेत, असे सांगण्यात आले.