‘अन्सर गझवातुल हिंद’च्या म्होरक्मयाचा समावेश- शोपियान-पुलवामामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळय़ा चकमकींमध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. शोपियानमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत 5 आणि शुक्रवारी पहाटेपासून पुलवामा-त्रालमधील संघर्षात दोघांना यमसदनी पाठविण्यात आले. कंठस्नान घालण्यात आलेल्यांमध्ये ‘अन्सर गझवातुल हिंद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इम्तियाझ अहमद शाह याचाही खात्मा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. काश्मीर पोलिसांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.
काश्मीरमधील त्राल भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यापैकी एक दहशतवादी ‘अन्सर गझवातुल हिंद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्मया असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, शोपियानमध्ये गुरुवारी तीन दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. शुक्रवारी पहाटेपासूनच लपून बसलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. हे दोघे मशिदीमध्ये लपून गोळीबार करत होते. या दोघांनाही अर्ध्या तासाच्या फरकाने ठार करण्यात आले. त्यामुळे शोपियानमध्ये झालेल्या संघर्षात ठार करण्यात आलेल्यांची एकूण संख्या 5 इतकी झाली आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे कारवाई करत ही शोधमोहीम राबवली. या कारवाईमध्ये 7 एके-47 रायफल्स आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
आत्मसमर्पणाचे प्रयत्न निष्फळ
लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम साहेब यांना दहशतवाद्यांना बाहेर आणण्यासाठी व आत्मसमर्पण करण्यासाठी मशिदीच्या आत पाठवण्यात आले होते. मशिदीला नुकसान होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. तथापि दहशतवाद्यांनी माघार घेण्याची तयारी न दर्शविल्याने त्यांचा खात्मा करण्यात आला. या संघर्षात सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेऊन गुप्तचर विभागाच्या मदतीने धडक कारवाई करण्यात येत आहे.