सर्व मंत्री देणार खात्यांच्या कार्यालयांना भेटी : अधिकारी, कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेणार
प्रतिनिधी /पणजी
‘मंत्री तुमच्या दारी’ हा उपक्रम राज्य सरकारने सुरु केला असून तो 14 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. काल गुरुवारपासून त्याची सुरुवात झाली असून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे जाऊन आपल्या खाते कार्यालयांना भेटी दिल्या आणि तेथील अधिकारी, कर्मचारीवर्गाच्या समस्या, कामकाज याची माहिती घेतली.
या उपक्रमाचे वेळापत्रक ठरवण्यात आले असून आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर रोजी कृषीमंत्री रवी नाईक हे सांगे येथे भेट देणार आहेत. आजच मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर हे मुरगांव येथे जाणार आहेत तर आजच कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे सालसेत येथे जाऊन खात्याच्या कार्यालयांना भेटी देणार आहेत.
दि. 10 ऑक्टोबर रोजी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हे फोंडा येथे जाणार असून त्याच दिवशी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल हे सत्तरीला भेट देणार आहेत. शिवाय त्याच दिवशी आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे पेडणे येथे जाऊन खाते कार्यालयांना भेटी देतील.
दि. 12 ऑक्टोबर रोजी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे बार्देश येथे कार्यालयांना भेटी देणार असून जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे 13 ऑक्टोबर रोजी धारबांदोडा येथे जाणार आहेत. दि. 14 ऑक्टोबर रोजी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हे काणकोण येथे जातील तर पर्यटनमंत्री रोहन खवंटे हे केपे येथे भेट देणार आहेत.
‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम 19 सप्टेंबर 2021 रोजी कोलवाळमधून सुरु करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांना ग्रामस्थांना त्यात सहभागी करुन घेण्यात आले होते. ‘मंत्री तुमच्या दारी’ ह्या उपक्रमात खाते प्रमुख, तालुका व तेथील कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांच्या गाठीभेटी शिवाय पालिका, पंचायतींना भेटी देणे, असा एकंदरीत कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले.