त्यांच्या प्रार्थना अन् मागण्या हैराण करणाऱया
भारतातील अनेक प्राचीन मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमध्ये लोकांच्या कामना पूर्ण होतात असे मानले जाते. कर्नाटकाच्या हासन जिल्हय़ातील एका प्राचीन मंदिरात दरवषीं हसनंबा महोत्सव आयोजित होतो. महोत्सवादरम्यान येथे मोठय़ा संख्येत भाविक पोहोचतात. यंदाही मोठय़ा संख्येत भाविक दाखल झाले. स्वतःची मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला भक्त चित्रविचित्र पत्रं लिहित आहेत.
देवाला लिहिण्यात आलेली अनेक पत्रे सोशल मीडियावर कुणीतरी पोस्ट केली आहेत. हे मंदिर वर्षात केवळ एकदा एक आठवडय़ासाठी खुले असते. यंदा भाविकांसाठी हे मंदिर 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत खुले होते. हे मंदिर स्वतःच्या चमत्कारांसाठी जगभरात ओळखले जाते. दिवाळीनंतर या मंदिरातील दर्शन एक वर्षासाठी बंद करण्यात येते.
अशा स्थितीत भाविकांनी पत्र लिहून देवाकडे अशा मनोकामना व्यक्त केल्या आहेत, ज्या वाचल्यावर विश्वासच बसत नाही. एका भक्ताने स्वतःच्या पत्रात मतदारसंघातील लोकांना नवा आमदार मिळावा अशी कामना केली आहे. विद्यमान आमदाराच्या कुटुंबातील प्रत्येक जण कुठल्या तरी निवडणुकीत पराभूत व्हावा असेही त्याने नमूद केले आहे.
अन्य एका भक्ताचे पत्र वाचल्यावर हसू आवरत नाही. माझ्या स्वतःच्या मोठय़ा मुलाला सुंदर पत्नी मिळावी अशी कामना एका भक्ताने पत्राद्वारे देवासमोर केली आहे. अन्य भक्ताने परीक्षेत 90 टक्के गुण मिळावेत अशी प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारची अनेक पत्रं व्हायरल होत आहेत. एका भाविकने पत्रात आपल्या घराजवळील रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावेत असे म्हटले आहे. तर अन्य भाविकाने मनोकामना पूर्ण झाल्यास मंदिराला 5 हजार रुपयांची देणगी देणार असल्याचे नमूद केले.
ऐतिहासिक मंदिर या मंदिराची निर्मिती होयसला वंशादरम्यान झाल्याचे मानले जाते. मंदिराच्या इतिहासाबद्दल कुठलेच दस्तऐवज नाही. होयसला राजवटीत कर्नाटकात हासन सर्वात मोठे शहर होते. हसनंबा मंदिराला हासनची कुलदेवी म्हणून मानले जाते.