चिली अन् पेरू येथील समुद्रात आढळणारा अनोखा दगड
दगडाला पाझर फुटणे अशी म्हण आपल्या बोलण्यात सर्रासपणे वापरली जाते. निर्दयी व्यक्तीला दगडाचे काळीज असणारा माणूस म्हटले जाते. पण या जगात एक रहस्यमय दगड असून तो कापल्यावर त्यातून रक्त बाहेर पडू लागते.
हा दगड जमिनीवर पडल्यावर त्याचे दोन तुकडे होतात आणि त्यातून रक्त वाहू लागते. या दगडाला जखम झाल्यावर रक्त वाहते तसेच यातील मांसासारखा पदार्थही बाहेर पडतो, जो लोक खातात. आता हा बाजारातही मोठय़ा प्रमाणात विकला जातो. हा अनोखा दगड चिली आणि पेरूच्या समुद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो. त्यांच्याकडे पाहिल्यास पहिल्या नजरेत तो तुम्हाला दगडासारखा दिसेल. या दगडाला जगभरात मेंपायुरा चिलियांसिस या नावाने ओळख्घले जाते.
अद्भूत क्षमता
हा दगड तोडताच यातून रक्त बाहेर पडते. हा दगड नेहमीच खडकांना चिकटून राहतो आणि याला पीरियड रॉक देखील म्हटले जाते. हैराण करणारी बाब म्हणजे यात रक्तासोबत मांस देखील असते. प्रत्यक्षात हा एक सागरी जीव असून तो दगडाप्रमाणे भासतो. हा तुटल्यावर यातून रक्त वाहू लागते. हा जीव श्वास घेण्यासह अन्नही फस्त करतो. निसर्गाने याला एक अद्भूत क्षमता प्रदान केली आहे. हा जीव स्वतःचे गुप्तांगही बदलू शकतो आणि याच्या मदतीने नवी पिढीही तयार करतो.
लोकांची मोठी पसंती
या दगडातून निघणाऱया मांसाद्वारे अनेक प्रकाराचे खाद्यपदार्थ आणि सॅलड तयार केले जातात. स्थानिक लोक या दगडाला कच्चेच खातात. या दगडाच्या शोधात लोक खोल समुद्रात पोहोचतात. या दगडातील मांसाची लोकांची मोठी पसंती असल्याने याची मागणी वाढली आहे. धारदार चाकूच्या मदतीने या दगडातील मांस बाहेर काढले जाते.