वार्ताहर/ सांबरा
बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे भरदिवसा लक्ष्मी मंदिरात चोरी करणाऱया महिलेला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. सध्या शहरासह ग्रामीण भागात चोऱयांचे सत्र सुरू असून चोरटय़ांनी मंदिरांनाही लक्ष बनवले आहे. त्यामुळे मंदिरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बसरीकट्टी येथे मंदिरात चोरी करताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की येथील लक्ष्मी गल्लीतील लक्ष्मी मंदिरामध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक महिला मंदिरात घुसली व त्यानंतर देवीच्या गळय़ातील मंगळसूत्र काढून घेऊन पलायन करताना त्याचवेळी समय खाली पडली व समईच्या आवाजाने शेजारचे लोक तेथे जमा झाले. यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत त्या महिलेने तेथून पळ काढला. व एका दुचाकी स्वाराकडून लिफ्ट घेऊन पळण्याच्या प्रयत्नात असताना तिला शिंदोळी क्रॉस येथे गावातील तरुणांनी पाठलाग करून पडकले व तिला गावात घेऊन आले. याची कल्पना लगेच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी येऊन चौकशी केली असता तिने चोरीचा गुन्हा कबूल केला. यावेळी तिच्याकडे ओळखपत्र सापडले असून आधार कार्डवर तिचे नाव असून ती मुरकुटेवाडी मजरे कारवे (ता. चंदगड) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मारिहाळ पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून तिने आणखी कोण साथीदार आहेत का याची अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी पोलिसांनी गस्त वाढवून चोरीचे प्रकार थांबावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.