प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील काँग्रेस आणि मगोच्या फुटीर आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवरील सुनावणी आता 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. काल मंगळवारी त्यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात निश्चित करण्यात आली होती. तथापि काही कारणामुळे सदर याचिका सुनावणीस येवू शकली नाही. परिणामी त्या याचिकेला आता पुढील तारीख देण्यात आली असून ती 26 ऑक्टोबर रोजी आहे.
मुख्य सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ती याचिका प्रलंबित असून मागील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी झाली होती. सभापती राजेश पाटणेकर यांच्या विनंतीनुसार त्यांना काही कागदपत्रे सादर करण्याकरीता याचिकेवरील सुनावणी स्थगित करून पुढील तारीख देण्यात आली परंतु काही करणास्तव सुनावणी न झाल्याने ती याचिका पुन्हा एकदा प्रलंबित राहीली आहे. अपात्रता याचिका दोन असून त्या एकाच विषयामुळे एकत्र जोडण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे 10 आमदार फुटून भाजपात गेले. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका सादर केली असून मगोपच्या 2 फुटीर आमदारांविरोधात मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सभापती राजेश पाटणेकर हे निकाल देत नाहीत म्हणूनही पुन्हा एकदा फेरयाचिकाही सादर करण्यात आली आहे.