भावंडांना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुण बेशुद्ध : अग्निशमन दलाच्या पथकाने काढले मृतदेह बाहेर
प्रतिनिधी / बेळगाव
दोन भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मजगाव येथे शुक्रवारी दुपारी घडली. या दोन्ही मुलांना वाचविणाराही विहिरीत बेशुद्ध होऊन पडला. दरम्यान, त्याला त्वरित बाहेर काढण्यात आल्यानंतर सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
कलमेश्वरनगर, थर्ड क्रॉस येथील दोन शाळकरी बंधू आनंद आडव्याप्पा हणबर (वय 13) व आकाश आडव्याप्पा हणबर (वय 15) ही दोन भावंडे परसातील मोकळय़ा जागेत क्रिकेट खेळत असता चेंडू विहिरीवरील झाकलेल्या जाळीवर पडला. तो काढण्याच्या प्रयत्नात लहान भाऊ आनंद विहिरीवरील जाळीचे झाकण तुटल्याने विहिरीत पडला. त्यानंतर बॅटिंग करणारा मोठा भाऊ तात्काळ विहिरीत दोरीच्या साहाय्याने उतरला असता सदर विहिरीत प्राणवायू कमी असल्याने घुसमटल्याने गुदमरून मृत्यू झाला. त्या दोघांनाही पोहता येत होते. सदर घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडली.
दोन्ही मुले शाळा सुट्टी असल्याने परसातील मोकळय़ा जागेत क्रिकेट खेळत होती. अनगोळ येथील संत मीरा इंग्लीश मेडियम शाळेमध्ये इ. 7 वी व 9 वी मध्ये शिकत होती. मात्र, शाळा सुट्टी असल्यानेच सदर घटना घडल्याचे येथील नागरिकांतून बोलले जात होते.
अडव्याप्पा नागाप्पा हणबर हे मूळचे विरप्पनकोप्प (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी गेली 22 वर्षे मजगाव येथील कलमेश्वरनगर येथे स्वतःचे घर बांधून फरशी फिटिंग व्यवसाय करत होते. त्यांना दोनच मुले होती. सदर मुलांची आई माला ही घरकाम करत असते.
सदर घटना घडल्यानंतर ती घरीच होती. विहिरीत काहीतरी पडल्याच्या आवाजाने बाहेर येऊन पाहते तर दोन्ही मुले दिसेनाशी झाल्याने तिने आरडाओरडा करताच लोक जमा झाले. विहिरीत वाकून पाहिले असता दोन्ही मुले विहिरीत पडलेली दिसत होती.
हे दृश्य पाहणाऱयांपैकी शेजारचा तरुण सचिन शहापूरकर याने स्वतःला दोर बांधून घेऊन विहिरीत उतरून या दोन्ही मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही गुदमरून पडल्याने त्याला तात्काळ बाहेर ओढून काढले असता तो बेशुद्ध पडला होता. सुदैवानेच त्याचे प्राण वाचले. त्यांना तात्काळ खासगी दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्यात आले.
सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाला व एस. डी. आर. एफ. दलाला व उद्यमबाग पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू झाले. यावेळी विहिरीत वरून पाण्याचा मारा करून अग्निशमन दलातील व एस. डी. आर. एफ. दलातील जवानांनी आपले कौशल्य पणाला लावून मृतदेह बाहेर काढले. उद्यमबाग पोलीस स्टेशनमार्फत पंचनामा करून दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
यावेळी अग्निशमन दलाचे वरि÷ अधिकारी इराप्पा आनंदगौडा पाटील व साहाय्यक व एस. डी. आर. एफ. दलाचे आनंदगौडा पाटील, नागेंद्र सुणार व त्यांचे सहकारी व उद्यमबाग पोलीस स्टेशनचे पीएसआय पी. बी. पुजारी, महिला हेड कॉन्स्टेबल कांबळे, चवलगी, अजित शिवपुरी व साहाय्यक यांनी घटनेचा पंचनामा केला.