ही तर विजयाची नांदी असल्याचे मांडले विचार
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मध्यवर्ती म. ए. समितीचे शुभम शेळके यांना उमेदवारी दिल्याने संपूर्ण सीमाभागात नवचैतन्य पसरले आहे. मराठी भाषा व संस्कृतीवर होणारी आक्रमणे थांबवून त्यांचे जतन करण्यासाठी म. ए. समिती निवडून येणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात असून त्याला बळकटी देण्यासाठी लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतांनी शुभम शेळके यांना निवडून देण्यासाठी मराठी उद्योजक, व्यापारी, वकील व माजी नगरसेवक भगव्या ध्वजाखाली एकत्रित आले आहेत.
शुक्रवारी मराठा मंदिर येथे एक व्यापक बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. ऍड. सुधीर चव्हाण यांनी आपण स्वतःच उमेदवार आहोत याप्रमाणे प्रत्येकाने कार्य करण्याचे आवाहन केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांनी सोमवारी शहरातून भव्य रॅली काढण्याचा विचार मांडला. प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे जबाबदारीचे विभाजन करण्याची भूमिका माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी मांडली. किरण परब यांनी अनगोळ विभागाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी नगरसेवक, लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रचार करण्याचा विचार मांडला. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी शिवसेनेचे अभिनंदन केले. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी दरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून, समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. बी. डी. मोहनगेकर यांनी पोस्टल मतदानावर लक्ष ठेवण्याची सूचना केली. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी प्रत्येकाने स्वतःच्या भागामध्ये प्रचार करण्याचा विचार मांडला.
यावेळी प्रकाश बापू पाटील, चिमणराव जाधव, एल. आय. पाटील, मनोज पावशे, राकेश पलंगे, श्रीकांत कदम, कृष्णा हुंदरे, नारायण कणबरकर, सागर पाटील, शिवाजी हंगीरगेकर, सुनील अष्टेकर, सरिता पाटील, रणजित चव्हाण पाटील, दत्ता जाधव, राजू बिर्जे, ऍड. अमर येळ्ळूरकर, संदीप खन्नूकर, प्रशांत भातकांडे, मालोजी अष्टेकर यासह रूपा नावगेकर, एस. एल. चौगुले, ऍड. शंकर पाटील, ऍड. महेश बिर्जे, ऍड. शाम पाटील, दिनेश रावळ, सुनील बाळेकुंद्री, आर. आय. पाटील, सुधा भातकांडे, प्रशांत भातकांडे, रूपा नेसरकर यांच्यासह मोठय़ा संख्येने संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते