एसजीपीडीएच्या सदस्य सचिवांकडून नोटीस जारी
प्रतिनिधी / मडगाव
कोविडबाधित आढळल्याने शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आलेले माडेल-मडगाव येथील घाऊक मासळी मार्केट बुधवार 26 रोजी पुन्हा खुले केले जाणार असल्याचे दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी जारी केलेल्या नोटिसीतून कळविले आहे.
सलग 5 दिवस बंद ठेवण्यात आल्यानंतर सदर घाऊक मासळी मार्केट पुन्हा खुले केले जाणार आहे. येथील मासळी कापण्याचे काम करणारे 5 जण कोविडबाधित आढळल्याने शुक्रवारपासून ते बंद ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. मार्केट पुन्हा खुले केले जाणार असले, तरी मासे कापणाऱयांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा एसजीपीडीएच्या सदस्य सचिवांनी नोटिसीतून दिला आहे.
राज्यभरातील कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिन्यात मासळी बाजार पुन्हा सुरू झाल्यापासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, असे एसजीपीडीएच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आले होते. विक्रेते व हजारो ग्राहक एकाचवेळी गर्दी करत असल्याने एसजीपीडीएने संपलेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला घाऊक मासळी विक्रेते संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही आणि सेनिटायजरचा वापर करण्यात येत नसल्याचा ठपका त्यात ठेवला होता. यामुळे प्राधिकरण कोणती तरी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यातच मासे कापणारे 5 जण कोविडबाधित निघाल्यानंतर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.