प्रतिनिधी / मडगाव :
सध्याच्या मडगाव पालिका मंडळाचा कारभार महिन्याभरानंतर संपुष्टात येणार असून आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, अन्य पक्ष व अन्य उमेदवार आणि स्वतंत्र पॅनल्स आपआपले जाहीरनामे तयार करतील. तेव्हा या सर्वांना पुन्हा आर्थिक राजधानीतील रखडलेला बहुमजली पार्किंग प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या जुन्या आश्वासनाचा उल्लेख करावा लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मडगाव पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी बहुमजली पार्किंग प्रकल्पासाठी 2015 साली पायाभरणी केली गेली होती. प्रकल्प उभारण्यासाठी त्यावेळी अंदाजे खर्च सुमारे साडेपाच कोटी रुपये होता. सध्या पालिकेने तयार केलेल्या ताज्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च 7.40 कोटी रुपये इतका झाला आहे. ‘जीएसआर’, ‘जीएसटी’ यामुळे किंवा पालिका मंडळाचा सुस्तपणा वा सरकारी अधिकाऱयांचा वेळकाढूपणा यामुळे म्हणा हा प्रकल्प उभा राहू शकला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पार्किंगचा ज्वलंत प्रश्न सोडवणे शक्य झालेले नाही.
सप्टेंबर, 2015 मध्ये आर्थुर डिसिल्वा नगराध्यक्ष असताना पार्किंगसाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली गेली होती. सदर पायाभरणी नामफलक दिमाखाने उभा आहे. त्यापुढे काही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. या जागेत मागील वर्षभरापासून सुका कचरा व त्याचे बेलिंग करण्यासाठीची यंत्रे दिसून येत आहेत. पुढच्या महिन्यात पालिकेला प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढणे शक्मय होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पालिकेने सुधारित दरानुसार निविदा काढण्यासाठी हालचाली केल्या, तरी तांत्रिक मंजुरीसाठी फाईल पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवावी लागणार आहे. त्यानंतर ई-निविदा काढावी लागेल. प्रकल्पाला तांत्रिक मंजुरीसाठी ‘साबांखा’ला सुमारे 25 दिवस लागतात. त्यानंतर निविदा व अन्य प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होणे शक्मयच नसल्याचे दिसून येत आहे.
जमेची बाजू म्हणजे मडगाव पालिकेकडे जुना मासळी बाजार वगळता पिकअप स्थानक आणि जुना बसस्थानक अशा मोकळय़ा जागा आहेत. तेथे पार्किंगसाठी बहुमजली प्रकल्प उभारणे शक्मय आहे. यावेळचे नसले, तरी आगामी पालिका मंडळ हा प्रकल्प मार्गी लावेल अशी आशा करण्यापलीकडे मडगावकरांच्या हातात काही नाही.