प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रात उघडय़ावर कचरा फेकण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. त्यामुळे कित्येक ठिकाणी ’ब्लॅक स्पॉट’ तयार झाले आहेत. अशा ब्लॅक स्पाटॅवर मात्र?ा म्हणून 29 लाख रु. किमतीचे व्हॅक्युम कचरा गोळा यंत्र वापरण्याचा विचार पालिकेने चालविला आहे, या यंत्राचे प्रात्यक्षिक सोमवारी दाखविण्यात आले.
मडगावचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा तसेच पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रात्यक्षिक पाहिले असता 10 ते 15 मिनिटांत एक ब्लॅक स्पॉट सदर यंत्र सफाईदारपणे साफ करते. एक चालक व एक कुशल कामगार या सफाईसाठी लागेल, असे आमदार कामत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पालिकेच्या नगरसेवकांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आल्यानंतर सदर यंत्रसंदर्भात आवश्यक निर्णय पालिका घेईल, असे कामत म्हणाले. नगराध्यक्ष पेरेरा यांनी, अशा प्रकारची फातोर्डा आणि मडगावसाठी दोन यंत्रे खरेदी केल्यास पालिकेला कित्येक ठिकाणी ब्लॅक स्पॉटमुळे सामोऱया जाव्या लागणाऱया समस्या दूर होतील, असे सांगितले. सदर यंत्र व्हॅक्युम पद्धतीद्वारे काही मिनिटांत कचरा ओढून घेते. त्यामुळे ब्लॅक स्पॉटवर जादा मनुष्यबळ व जेसीबी वापरून कचऱयाची सफाई करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा दावा यावेळी करण्यात आला