प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव परिसर आज रविवारी शिमगोत्सव मिरवणुकीने दुमदुमून जाणार असून यावेळी लोकांना चित्ररथ, रोमटामेळ पाहायला मिळणार आहेत. सायंकाळी कोलवा सर्कल येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील रस्ता ते रवींद्र भवनमार्गे दामोदर देवस्थानापर्यंत ही मिरवणूक होणार असून या मिरवणुकीला सायंकाळी 3 पासून सुरुवात होणार आहे. यावेळी वेशभूषा स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती मडगाव शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक रवींद्र (राजू) नाईक यांनी दिली आहे.
मडगाव शिमगोत्सव समितीतर्फे शिमगोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची या मिरवणुकीने सांगता होणार आहे. समितीकडून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना शुक्रवार सायंकाळपासून सुरुवात होऊन त्याअंतर्गत मागील दोन दिवस पालिका इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कला पथकांनी आपली कला पेश केली. शुक्रवारी मुंबई येथील पथकाने सादर केलेला मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम तसेच जगदंब ढोल-ताशा पथक व समईनृत्यांचा कार्यक्रम हे आकर्षण ठरले. शनिवारी मुंबईतील लावण्यतारकांचा लावणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. याखेरीज युनिटी पथकाचा नृत्य कार्यक्रमही झाला. या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.