बहुमजली पार्किंग प्रकल्प रखडला
प्रतिनिधी /मडगांव
गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखण्यात येणाऱया मडगाव शहरात वाहन पार्किगची समस्या जटील बनली आहे. मडगाव पालिके तर्फे बहुमजली पार्किग प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रकल्प रखडल्याने समस्येत आणखीन भर पडू लागली आहे. भाजपने पार्किग प्रकल्प मार्गी लागत नसल्याने काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे.
मडगाव नगरपालिकेवर गोवा फॉरवर्ड व काँग्रेसचे मंडळ गेली दहा वर्षे कार्यरत आहे. मात्र, गेली सात वर्षे त्यांना बहुमजली पार्किग प्रकल्पचा प्रस्ताव पुढे नेण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने आत्ता सोशल मीडियाचा आधार घेत काँग्रेस व गोवा फॉरवर्डला टार्गेट करण्यास सुरवात केली आहे.
मडगाव शहरात शेकडो वाहने येत असतात. पण, वाहन पार्क करायचे झाल्यास शहरात तीन-चार फेऱया माराव्या लागतात. तरी सुद्धा पार्किगसाठी जागा मिळणे कठीण जात असते. अशावेळी वाहन चालक रस्त्यावरच आपली वाहने पार्क करून जातात. वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने समस्या गंभीर बनलेली आहे. पार्किगची समस्या प्राधान्य क्रमाने सोडविण्याची गरज असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मडगाव पालिका क्षेत्राच्या लोकसंख्येबरोबरच वाहन संख्याही वाढत आहे. याबरोबरच आपसापच्या परिसरातील वाहनेही या शहरात दाखल होत आहेत. वाहने वाढली तरी शहरातील रस्ते तेवढेच राहिल्याने स्वाभाविक पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. वाहने पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. यामुळे जागा व्यापते आणि वाहतूक कोंडी होते. नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी नियोजित जागा उपलब्ध नसल्याने सर्वत्र रस्त्यावर होणाऱया बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली आहे.
मडगाव शहरातील न्यू मार्केट परिसर, गांधी मार्केट परिसर, स्टेशन रोड, पालिका उद्यान परिसर, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रेस चर्च, लोहिया मैदान परिसर इत्यादी भागात वाहन पार्क करण्यासाठी वाहन चालकांना प्रतीक्षा करावी लागते. शहरात बऱयाच जुन्या इमारती व घरे असून त्यांना वाहन पार्किंगची सोय नसल्याने या इमारतींनी तसेच घरांनी राहणारे लोक आपली वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क करतात. आत्ता नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीत पार्किगची सोय सक्तीची करण्यात आलेली आहे. शहरातील पार्किग समस्ये संदर्भात आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना न्यू मार्केट टेडर्स असोसिशएनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले की, बहुमजली पार्किग प्रकल्प हाच आत्ता शेवटचा पर्याय शिल्लक राहिला असून हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विशेष परिश्रम घ्यावे लागेल.