तांत्रिक विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप, फायली गायब होत असल्याच्या तक्रारी, सोनसडा शेडची फाईल गायब झाल्याने कनिष्ठ अभियंत्यांना कक्षात जाऊन धारेवर धरण्याचा प्रकार
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका मंडळाच्या गुरुवारी सकाळी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत तांत्रिक विभागाकडून भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप नगरसेवकांनी केले व विकासकामांसाठीच्या फायली गायब होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने गदारोळ माजला. त्यातच सोनसडा येथे शेड उभारण्यासंबंधीची फाईल गायब असल्याने बहुतेक नगरसेवकांनी बैठक अर्ध्यावर सोडून तांत्रिक विभागातील संबंधित कनि÷ अभियंता विकास देसाई यांच्या केबिनकडे मोर्चा वळविला असता या विकासकामाची मोजमाप वही त्यांच्याकडे सापडली. यावेळी बहुतेक नगरसेवकांनी अभियंता देसाई यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी उचलून धरली.
सदर शेड उभारण्याच्या कामाची फाईल या विभागाच्या महिला कारकुनाकडे असून गुरुवारी त्या रजेवर होत्या. त्या आज शुक्रवारी कामावर रूजू झाल्यानंतर आपण सदर फायलीसंदर्भात सर्व माहिती जाणून घेणार व ती न मिळाल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आणखी किती फायली गायब आहेत अशी विचारणा केली असता रस्ता उभारण्यासाठीची एक फाईल मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्या कक्षातून गायब असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही फायलींचा आज शोध घेतला जाईल व त्या हाती न लागल्यास पोलीस तक्रार करणार असून कित्येक नगरसेवकांनी तशी मागणी केली आहे, असे नगराध्यक्ष पेरेरा यांनी सांगितले.
नगराध्यक्ष म्हणून फायली पाहण्याचा अधिकार ः पेरेरा
विकासकामे, बांधकामे यासंदर्भातील फायली आपणाकडे येत नाहीत. त्यामुळे त्या फायलींचा आपण टेक ठेवू शकत नाही. वरील संबंधित फायली आपल्या नजरेस आणाव्यात यासाठी आपण मुख्याधिकारी फर्नांडिस यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यास कोणतेही उत्तर देणे त्यांनी टाळले. नगराध्यक्ष म्हणून आपणास देखरेख ठेवण्यासाठी फायली पाहण्याचा अधिकार पालिका कायद्यात आहे, असे पेरेरा एका प्रश्नावर उत्तरले.
मुख्याधिकाऱयांनी फायली न पाठविल्यास तक्रार करणार
नुकत्याच नगरविकासमंत्री, नगरविकास सचिव व पालिका संचालक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पालिका संचालकांकडून विकासकामे का मार्गी लागत नाहीत असा सवाल मला करण्यात आला असता तांत्रिक विभाग फायली अडवून ठेवून विकासकामांत खो घालत असल्याचे मी त्यांच्या नजरेस आणून दिलेले आहे, असे पेरेरा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मुख्याधिकाऱयांनी यापुढे फायली माझ्याकडे न पाठविल्यास पालिका संचालकांना पत्र पाठवून तक्रार नोंदविणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
अभियंते हात ओले करून घेत असल्याचा आरोप
पालिका अभियंता दिनीज डिमेलो यांची वास्को पालिकेत बुधवारी बदली झाली असून तेथील मनोज आर्सेकर मडगाव पालिकेत ताबा घेणार आहेत. मात्र अजूनही आर्सेकर यांनी ताबा न घेतल्याने डिमेलो पालिका मंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. डिमेलो व विकास देसाई या दोघा अभियंत्यांची मिलीभगत आहे. डिमेलो हे फक्त देसाई या कनि÷ अभियत्यांना फायली मार्क करून देऊन दोघे हात ओले करून घेत असल्याचा आरोप यावेळी बहुतेक नगरसेवकांनी केला. डिमेलो यांच्याप्रमाणे देसाई यांची बदली न करता त्यांना निलंबितच करावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली.
कनिष्ठ अभियंत्यांना धारेवर धरले
कनि÷ अभियंता विकास देसाई यांच्या केबिनकडे मोर्चा वळविला असता नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक, दामोदर शिरोडकर, सदानंद नाईक, पूजा नाईक यांनी प्रश्नांचा भडिमार करून कनि÷ अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी सोनसडा शेडची मोजमाप वही त्यांच्या केबिनमध्ये मिळाली असली, तरी कामाची फाईल महिला कारकुनाकडे आहे असा अभियंत्यांनी दावा केल्याने काही नगरसेवकांनी त्यांना कोंडीत पकडले. मोजमाप वहीही कारकुनाकडे असणे आवश्यक होते, ती तुम्ही का ठेवून घेतली, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. नगरसेवक आमोणकर यांनी तांत्रिक विभागाकडून बांधकाम प्रकल्पाच्या फायली महिनोन्महिने अडवून ठेवल्या जातात, असा आरोप केला.