लिंडन पेरेरा, दिपाली सावळ यांचेच अर्ज : आजच्या बैठकीत होणार अधिकृत घोषणा
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाच्या नागरी आघाडीच्या अनुक्रमे लिंडन पेरेरा व दिपाली सावळ यांनी तेवढे बुधवारी अर्ज दाखल केल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड पक्की झाली आहे. आज गुरुवारी सकाळी 11 वा. पालिका संचालकांनी या निवडीसाठी पालिका मंडळाची विशेष बैठक बोलावली असून त्यावेळी यासंदर्भात अधिकृत घोषणा करून सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत. यावेळी गोवा नागरी सेवेचे वरि÷ अधिकारी श्रीनेत कोठावळे हे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी दुपारी 12 पर्यंत वरील दोन पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती. प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक लिंडन प्रेडी पेरेरा यांनी नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज भरले असता त्यांना दिपाली सावळ आणि पूजा नाईक यांनी अनुमोदन दिले. उपनगराध्यक्षपदासाठी प्रभाग 16 च्या नगरसेविका दिपाली सावळ यांनी दोन अर्ज दाखल केले असता त्यास नगरसेवक सगुण (दादा) नाईक आणि लिंडन पेरेरा यांनी अनुमोदन दिले.
दोन्ही पदांसाठी अन्य अर्ज आले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे, असे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सर्व नगरसेवकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदावर अधिकृतरीत्या निवड करण्यापूर्वी शपथ दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वरील पदांसाठी अर्ज न भरता मागील खेपेप्रमाणे विरोधी गटातील भाजपपुरस्कृत गटाच्या नगरसेवकांनी अलिप्त राहणे पसंत केले. यंदा विरोधी गटात 7 भाजप व त्यांना समर्थन देणारे एक अपक्ष मिळून 8 नगरसेवक आहेत. मागील खेपेला गोवा फॉरवर्ड व काँग्रेस आघाडीकडे 17 सदस्य होते. 5 अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने त्यातील तिघांनी आघाडीला समर्थन दिले होते, तर फक्त तीन नगरसेवक भाजपकडे होते. त्यावेळी आघाडीचे दोन्ही पदांसाठीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
पदांच्या वाटणीच्या फॉर्म्युलावर काँग्रेस नगरसेवक नाराज
दरम्यान, आघाडीने फातोर्डा व मडगावसाठी प्रत्येकी सव्वावर्षासाठी मिळून चार नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय घेताना प्रथम फातोर्डाला नगराध्यक्षपद व मडगावाला उपनगराध्यक्षपद, नंतर दोन वेळा सव्वावर्षासाठी मडगावला व शेवटी फातोर्डाला नगराध्यक्षपद असा फॉर्म्युला तयार केला आहे. फातोर्डाला प्रथम नगराध्यक्षपद दिल्याने मॉडेल मडगावचे घनश्याम शिरोडकर व दामोदर शिरोडकर या नगरसेवकांनी आमदार दिगंबर कामत यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व नगरसेवकांच्या बैठकीला घनश्याम यांनी काही कामानिमित्त हजर राहू शकणार नसल्याचे कळविले होते, तर दामोदर यांनी उपस्थिती न लावता नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली. वरील दोन्ही नगरसेवक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यांना पुढील वेळी नगराध्यक्षपद देण्यात येईल असे स्पष्ट केले असले, तरी त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर काय होईल याची शाश्वती नसल्याचे दिसून येते. निवडणुका पक्षपातळीवर होत नसल्याने कोणी कोणाशी संधान बांधू शकतात. त्यामुळे नगरसेवक फोडण्यासाठी घोडेबाजाराला वाव आहे. याची भीती त्यांना सतावत असावी अशी चर्चा बुधवारी पालिका आवारात सुरू होती. बुधवारी काहींनी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. गोवा फॉरवर्डच्या एका ज्ये÷ नगरसेवकाकडे काही माजी नगरसेवकांनी संपर्क साधला, पण ते बधले नाहीत व त्यांनी आपले सर्वोसर्वा आमदार विजय सरदेसाई यांच्या कानावर सदर गोष्ट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मडगावातील दोन नाराज नगरसेवकांकडून आज नगराध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.