प्रतिनिधी/ मडगाव
फेब्रुवारी महिन्यात गोव्यात नगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असून भाजपने जिल्हा पंचायतीवर वर्चस्व मिळविल्यानंतर आत्ता नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. मडगाव पालिकेवर यावेळी भाजपची सत्ता असावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. मडगाव, फातोर्डा व कुडतरीचा काही भाग धरून मडगाव पालिकेचे कार्यक्षेत्र आहे.
यावेळी प्रभाग आरक्षणात फार मोठा बदल होणार नसल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. फातोर्डा पूर्ण मतदारसंघ व कुडतरी मतदारसंघाचा काही भाग मडगाव पालिका क्षेत्रात येत असून याठिकाणी भाजपचे उमेदवार कोण असावे हे जवळपास नक्की झालेले आहे. फातोर्डा व कुडतरीची जबाबदारी फातोर्डाचे माजी आमदार तसेच भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांच्यावर आहे.
मडगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोण असावे यांची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच मडगाव मंडळाला घ्यावी लागणार आहे. उलपब्ध माहिती प्रमाणे, मडगावातील काही प्रभागात भाजपच्या उमेदवारीसाठी एकापेक्षा जास्त जण इच्छुक असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची? असा प्रश्न भाजपसमोर उभा ठाकलेला आहे. ज्या प्रभागात एकापेक्षा जास्त उमेदवार असतील त्याठिकाणी सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन तोडगा काढला जाणार आहे. जर इच्छुकांपैकी उमेदवारी नाकारली तर कोणी अपक्ष उमेदवारी दाखल करू नये याची देखील पक्षाला काळजी घ्यावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केली तर भाजपच्या मतांची विभागणी होऊन भलताच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने, उमेदवार निवडीसाठी नेत्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार असल्याचे संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत.
पक्षाध्यक्ष सदानंद शेटतानावडे मडगावात
दरम्यान, प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेटतानावडे व पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांनी नुकतीच मडगाव भाजप कार्यालयाला भेट देऊन फातोर्डा व मडगावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सध्या पक्षातर्फे प्रशिक्षण शिबीरे घेतली जात असून त्यासाठी श्री. तानावडे व श्री. धोंड मडगावात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
सदानंद शेटतानावडे हे काल उशिरापर्यंत मडगाव व फातोर्डात प्रमुख कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेण्यात गुंतले होते. या गाठीभेटी पक्ष मजबुतीसाठी असल्याचे सूत्रांनी सांगितले तरी आगामी पालिका निवडणुकीसाठीची रणनिती म्हणूनही या गाठीभेटीकडे पाहिले जात आहे.