प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने 27 ऑक्टोबरची उद्घाटनाची तारीख लांबणीवर पडल्यानंतर अखेरीस आज बुधवार 3 रोजी सकाळी 11 वा. एसजीपीडीए किरकोळ मासळी बाजार येथील 5 टन क्षमतेच्या बायोमिथेनेशन प्रकल्प?ाचा शुभारंभ करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली. पालिकेच्या तांत्रिक विभागाने या प्रकल्पाची प्राथमिक तपासणी केली असून हा प्रकल्प सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखविला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नुवे आमदार विल्प्रेड डिसा, नगरविकास सचिव तारिक थॉमस यावेळी उपस्थित असतील. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर, मुख्याधिकारी फर्नांडिस, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उपनगराध्यक्ष दिपाली सावळही यावेळी उपस्थित राहतील. मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी मडगावला कचरा आणि हानिकारक प्लास्टिकपासून मुक्त करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
मडगाव पालिकेच्या 5 टन क्षमतेच्या तीन बायोमिथेनेशन प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प 27 ऑक्टोबर रोजी कार्यान्वित केला जाणार होता. मात्र किरकोळ कामे राहिल्याने हे उद्घाटन लांबणीवर टाकले होते. आधी आठवडाभर प्रकल्पाची चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतरच उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल, असे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी त्याची कल्पना देताना स्पष्ट केले होते.
सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बायोमिथेनेशन तंत्रज्ञान पालिका क्षेत्रातील कचरा समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. आणखी दोन 5 टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांसंदर्भात अर्ज केलेल्या कंत्राटदारांना कामाचे आदेश देण्यापूर्वी वरील प्रकल्पाचे कामकाज पाहून निर्णय घेणे सोपे होईल, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱयाने दिली. याखेरीज 25 टन क्षमतेचे दोन मोठे बायोमिथेनेशन प्रकल्प सोनसडय़ावर उभारण्याचा प्रस्ताव आहे.
दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या किरकोळ मासळीविक्री बाजार संकुलामध्ये हा पहिला 5 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प पुण्यातील उर्जा बायो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडद्वारे उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी 2.30 कोटी रु. खर्च आला आहे. मडगाव पालिका क्षेत्रात दिवसाकाठी 35 टन ओला कचरा गोळा होत असतो. बायोमिथेनेशन तंत्रज्ञान येथील कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य आहे की नाही ते हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.