वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यात मगरींचे वास्तव्य वाढत असून मणेरीत शेतविहिरीत आठ फुटी मगर आढळली. याबाबतची अधिक माहिती अशी की, मणेरी येथील यशवंत परब यांच्या शेतविहिरीत मगर असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ दोडामार्गमधील सर्पमित्र युवराज ऐनापूरकर यांच्या कानावर घातली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना या शेतविहिरीत मगर असल्याचे दिसले. त्यानंतर युवराज यांनी ही माहिती दोडामार्ग वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाने कुडाळ येथील अनिल गावडे रेस्क्यू टीमशी संपर्क साधून मगरीला पकडण्यात यश मिळविले. यावेळी दोडामार्ग मधील सर्पमित्र युवराज ऐनापूरकर व राहुल निरलगी यांनी सहाय्य केले.