आमदार नीतेश राणे यांची मागणी : कोरोनाच्या अँटिजेनपेक्षा आरटीपीसीआर टेस्ट करा!
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्लाझ्मा थेरेपीद्वारे रुग्णांवर उपचार करा. जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा. देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरेपी अंमलात आणली जात आहे. त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर जिल्हय़ात करा, असे पत्र आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जनतेचा अँटिजेन टेस्टवर विश्वास नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आरटीपीसीआर टेस्ट करा, असेही त्यांनी सूचित केले आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांना प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू करण्यासाठी राणे यांनी दुसऱयांदा पत्रव्यवहार केला आहे. पत्रात म्हटले आहे, सध्याच्या कोरोना महामारीच्या आजाराने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर शासनाकडून विविध उपाय योजनांद्वारे आजार आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने 29 जून 2020 रोजीच्या पत्राद्वारे प्लाझ्मा थेरपीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांना उपचार करण्याची सूचना केली होती. त्यावर अद्याप काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सध्या जिल्हय़ात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करून त्याद्वारे कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार झाल्यास आजार आटोक्मयात येऊ शकतो. तरी याबाबत गंभीरपणे त्वरित निर्णय घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे.
अँटिजेन तपासणी सदोष असल्याचे तज्ञांचे मत
सध्या कोरोना संशयित असलेल्या रुग्णांची अँटिजेन तपासणी करण्यात येते, परंतु ही पद्धती सदोष असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून या म्हणण्यास पूरक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांची जास्तीत जास्त आरटीपीसीआर तपासणी करावी, अशी मागणी जनतेकडूनच होत आहे. याबाबत आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही व्हावी, असे आमदार राणे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.