खासबाग-शाहूनगर येथील नाईट शेल्टरना मास्क-सॅनिटायझरचा पुरवठा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने विविध संघटना व मनपाच्यावतीने स्वच्छता कामगारांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले होते. मात्र, सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. काही स्वच्छता कामगारांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नाईट शेल्टरमधील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर आणि फेसशिल्ड वितरित करण्यात आले.
कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण राज्यात क्लोजडाऊन करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. क्लोजडाऊन काळातही मनपाच्या स्वच्छता कामगारांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे काही समाजसेवी संघटनांनी स्वच्छता कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते. तसेच महापालिकेनेदेखील मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोव्ज वितरित केले आहेत.
महापालिकेच्या नाईट शेल्टरमध्ये बेघर नागरिक आसरा घेत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी मनपाची आहे. सध्या कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांसह स्वच्छता कंत्राटदार आणि स्वच्छता कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेच्यावतीने नाईट शेल्टरकरिता सेफ्टी किटचे वितरण करण्यात आले. प्रत्येक केंद्राकरिता थर्मल स्क्रिनिंग मशीन, मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली. खासबाग आणि शाहूनगर अशा दोन ठिकाणी नाईट शेल्टर आहेत. त्यामुळे शुक्रवारी मनपाच्यावतीने सेफ्टी किट वितरित करण्यात आले. यावेळी मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, अभियंत्या महादेवी आदी उपस्थित होते.