कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांची महापालिकेला भेट : योजना-नियमावलींची जाणून घेतली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरातील गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. याच धर्तीवर आता कॅन्टोमेंट बोर्डच्यावतीने कॅम्प परिसरातील रहिवाशांसाठी सरकारी योजना राबविण्यात येणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद आणि कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला भेट देऊन योजनांची व नियमावलींची माहिती जाणून घेतली.
केंद्र आणि राज्य शासनाकडून गोरगरीब आणि गरजूंसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांना या योजनांचा लाभ मिळत नाही. कॅन्टोन्मेंट परिसरात लष्करी प्रशिक्षणासह सर्वसामान्य नागरिकांची वस्तीदेखील निर्माण झाली आहे. या परिसरात येणारे रहिवासी मतदानाचा हक्क बजावतात. पण त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनाही मिळावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेऊन केंद्र शासनाने सरकारी योजना कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डला सूचना केली आहे. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणाऱया अनुदानातून गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी सरकारी योजना राबविण्याची सूचना केली आहे. याकरिता निधी राखीव ठेवण्यात यावा, असा आदेश बजावला आहे.
राज्य शासनाकडे पाठपुराव्यानंतर आता राज्य शासनानेही कॅन्टोन्मेंटला अनुदान देण्यास प्रारंभ केला आहे. मात्र या अनुदानातून सरकारी योजना राबविण्याची अट घातली आहे. यापूर्वी कॅन्टोन्मेंटकडून कोणत्या योजना राबविण्यात आल्या नाहीत. परिणामी योजनांची माहिती व नियमावलीबाबत काहीच माहिती अधिकाऱयांना नाही. त्यामुळे महापालिकेला मिळणाऱया अनुदानातून विविध योजना राबविण्यात येतात, या योजनांची माहिती आणि नियमावली जाणून घेण्यासाठी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी महापालिकेला भेट दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर, महसूल विभागातील अधिकारी राजश्री आदी उपस्थित होते.
सरकारी योजनांचा लाभ मिळणार
गरिबी निर्मूलन विभागातील अधिकाऱयांकडून योजनांची माहिती व नियमावली जाणून घेतली. तसेच संगणक विभागातील अधिकाऱयांची भेट घेऊन माहिती घेतली. लाभार्थींची निवड कोणत्या प्रकारे केली जाते, लाभार्थ्यांचे अर्ज छाननी करण्याची पद्धत, अर्जाचा नमुना, लाभार्थींना किती साहाय्यधन दिले जाते, अशी विविध माहिती घेण्यात आली. महापालिकेच्या धर्तीवर सरकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनाही यापुढे सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.