मंगळवारी रुजू झालेल्या अभियंत्यांची ओळख परेड : कामाची सोपविली जबाबदारी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमधील लोकसंख्या वाढल्याने नगरविकास खात्याने नव्या नोकर भरती व बदली कायद्याची अंमलबजावणी केली आहे. यानुसार कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे. बेळगाव महापालिकेत 28 कनिष्ठ अभियंत्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने 8 कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली असून ते महापालिकेत रुजू झाले. मंगळवारी अभियंत्यांची ओळख परेड करून कामाची जबाबदारी सोपविण्यात आली.
महापालिका कार्याची व्याप्ती 2006 मध्ये वाढविण्यात आली आहे. यामुळे शहराचा पसारा वाढला आहे. त्याचप्रमाणे शहर व्याप्तीमध्ये लोकसंख्या, वसाहती आणि नागरिकांच्या समस्या व नागरी सुविधांची मागणीही वाढली आहे. यामुळे शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. पण योजनांची अंमलबजावणी आणि देखभालीसह नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेकडे आवश्यक कर्मचारी संख्याबळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या शहराची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात पोहोचली आहे तर 1 लाख 30 हजारहून अधिक मालमत्ता आहेत. यामध्ये 100 हून अधिक नवीन नगरांचा समावेश झाला आहे. यामुळे प्रत्येक भागात जाऊन समस्या जाणून घेणे व सोडविणे यासाठी महानगरपालिकेत संख्याबळ खूपच कमी आहे.
महापालिका कार्यक्षेत्राचे विभाजन चार उपविभागात करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण उपविभाग 1 व 2, उत्तर उपविभाग 1 व 2 अशी विभागणी करून कामकाज वाटून घेण्यात आले आहे. प्रत्येक उपविभागातील कामे करण्यासाठी किमान 7 अभियंत्यांची आवश्यकता आहे. यामध्ये शहर अभियंते, कार्यकारी साहाय्यक अभियंते, वरिष्ठ अभियंते, कनिष्ठ अभियंते आदींचा समावेश आहे. या चारही उपविभागात एकूण 28 कनिष्ठ अभियंत्यांची आवश्यकता आहे. यापैकी सध्या 15 अभियंते असल्याने रिक्त पदे भरण्यासाठी आठ कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती नगरविकास खात्याने केली आहे.
एकूण 56 अभियंत्यांची गरज
महापालिकेचे कामकाज करण्यासाठी एकूण 56 अभियंत्यांची गरज आहे. पण सध्या 30 अधिकारी कार्यरत असून 26 जागा रिक्त आहेत. विद्युत पथदिपांची देखरेख, नाल्यांची देखरेख, उद्यान विकास, महापालिका कार्यालयांची देखरेख, व्यापारी संकुलांची देखरेख अशा विविध कामांची जबाबदारीदेखील अभियंत्यांवर दिलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया विकासकामांवर देखरेख करण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या सोडविणे अशा विविध कामांची जबाबदारी अभियंत्यांना सांभाळावी लागते.
वेळेत कामे करण्याची सूचना सध्या महापालिकेत काही अभियंते कायमस्वरूपी तर काही अभियंत्यांची डेप्युटेशनवर नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी सात कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी काही अभियंत्यांची बदली झाली असून काही अभियंत्यांना बढती मिळाली आहे. अलीकडेच आणखी आठ अभियंत्यांची नियुक्ती नगरविकास खात्याने केली आहे. यापैकी काही अभियंते सोमवारी मनपा कार्यालयात हजर झाले आहेत. या अभियंत्यांची ओळख परेड तसेच कामाची जबाबदारी सोपविण्यासाठी मंगळवारी सकाळी मनपा कार्यालयात बैठक झाली. मनपा अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. दिलेल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, तसेच वेळेत कामे करण्याची सूचना केली.