15 कि.मी. वीजवाहिन्यांसह 207 खांब बदलणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱया उद्यमबाग वसाहतीत वीजवाहिन्या व खांब बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये या परिसरातील 15 कि.मी. लांबीच्या जुन्या वाहिन्या व खांब बदलण्यात येणार आहेत. या कामाला सुरुवात झाली असून औद्योगिक वसाहतीला सुरळीत वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे.
उद्योगांना 24 तास सुरळीत वीजपुरवठा देणे आवश्यक असते. परंतु बऱयाच ठिकाणी वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार समस्या येत असतात. उद्यमबाग येथे अनेक वर्षांपूर्वी वाहिन्या घालण्यात आल्या होत्या. त्या जीर्ण झाल्याने हेस्कॉमकडून बदलल्या जाणार आहेत. तसेच 207 नवीन वीजखांब घालण्यात येणार आहेत. जुने खांब बदलून त्या ठिकाणी नवे खांब तसेच काही वसाहतीत नवे खांब बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
नागरिकांचे सहकार्य गरजेचे
रविवारी कारखाने बंद असल्याने त्या दिवशी दुरुस्तीचे काम हेस्कॉमकडून करण्यात येत होते. परंतु प्रत्येक रविवारी हे काम केल्यास वेळ लागणार असल्याने सलग 15 दिवस काम करून पूर्ण केले जाणार आहे. प्रत्येक विभागातील काही ट्रान्सफॉर्मर बंद करून काम केले जाणार आहे. ज्या विभागात वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्या विभागातील उद्योजकांना एक दिवस आधी माहिती देण्यात येईल, असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले आहे.
वीजखांब जीर्ण झाल्याने बदलण्यात येणार
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला 24 तास सुरळीत वीजपुरवठा द्यावा लागतो. परंतु बऱयाच ठिकाणचे वीजखांब जीर्ण झाल्याने ते बदलण्यात येणार आहेत. एकूण 15 कि.मी. लांबीच्या एलटी वाहिन्या व खांब बदलण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमचे
साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर यांनी दिली.