प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे व्यवसाय आणि कामे थंडावली आहेत. अशातच संचारबंदी करण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याच दरम्यान एका वृद्ध महिलेला अडचणींचा सामना करावा लागला. वृद्धेला मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी महापालिका अधिकाऱयांकरवी तातडीने मदत पाठविली. यामुळे आयुक्तांच्या माणुसकीचे दर्शन दिसून आले.
लॉकडाऊन काळात बेळगावकरांची काळजी घेण्याची धुरा जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्तांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे रात्रंदिवस प्रयत्न करून प्रत्येक गोष्टीची काळजी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. घेत आहेत. औषध फवारणी असो किंवा परप्रांतीयांना राहण्याची व्यवस्था तसेच होम क्वॉरंटाईनसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध केली आहे. शहरवासियांच्या आरोग्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी व स्वच्छता कामगारांच्या आरोग्याची काळजी आयुक्तांनी घेतली आहे. झोपडपट्टी आणि बंदिस्त असलेल्या परप्रांतीय कामगारांसह दररोज 800 नागरिकांना जेवण पुरविण्याचे काम आयुक्तांनी चालविले आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे आवश्यक सुविधा नसल्याने कॅन्टोन्मेंटला मदत करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी आयुक्तांना बजावला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासियांच्या मदतीला महापालिका यंत्रणा धावून गेली आहे. आश्रय कॉलनी आणि शहरात असलेल्या गरजूंना अन्न पुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कंग्राळी येथील एका वृद्धेला रेशनची गरज असल्याची माहिती आयुक्तांना मिळताच वृद्ध महिलेला रेशनचे किट पोहचविले आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना गरजूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.