मुंबई \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या जबरदस्त विजयाबद्दल सर्व देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींना गुलाबांचा गुच्छ देतानाचा स्वत:चा जुना फोटो पोस्ट करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा उल्लेख असणाऱ्या काही ओळी लिहीत ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या लक्षणीय यशसाठी ममता बॅनर्जीचं अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचं महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसामावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो,असं राज यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं देखील मनापासून अभिनंदन केले आहे.
विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातून शुभेच्छां वर्षाव होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती, शिवसेना नेते संजय राऊत तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, आदी नेत्य़ांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.