ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी प्रचाराच्या रणांगणातून बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, नंदीग्राम येथील हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या हाडांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा डावा पाय संपूर्णपणे प्लॅस्टरमध्ये आहे. या दुखापतीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासारखा हुकमी एक्का प्रचारात न उतरल्यास तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची एक्स रे आणि एमआयआय चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाचा घोटा, उजवा खांदा, दंड आणि मानेच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती SSKM रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
ममता बॅनर्जी यांचा आवाज शांत करण्यासाठी झालेला हा काही पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुकारलेल्या ऐतिहासिक आंदोलनावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र, कोणत्याही हल्ल्यामुळे त्या मोडून पडल्या नाहीत. ममता बॅनर्जी या आजपर्यंत जनतेचा आवाज बुलंद करत आल्या, आहेत आणि राहतील, असे तृणमूल काँग्रेसच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.