प्रतिनिधी/ पणजी
मयडेचे पंचसदस्य महेश साटेलकर व सूर्यकांत भाटलेकर यांनी शनिवारी आप गोवा डेस्क प्रभारी आतिशी, आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि आप जिल्हा पंचायत उमेदवार स्मिता शेट यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत मयडेच्या माजी सरपंच पूनम वळवईकर तसेच माजी पंच रामा साटेलकर यांनीही असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विविध घोटाळय़ांमध्ये सहभाग घेतल्याने, लोक ’आप’मध्ये सामील होत आहेत. त्यांना राज्यात बदल घडवायचा आहे आणि ’आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे सुशासन त्यांनी पाहिले आहे. ’आप’चे मॉडेल गोव्याचा कायापालट करू शकते असे म्हांबरे यांनी सांगितले.
केजरीवाल यांचे ’व्हिजन’ हे गोव्यासाठी एक नवीन आशा
पंचसदस्य महेश साटेलकर हे सामाजिक कार्यकर्ते असून 2017 मध्ये त्यांनी मगोच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवली होती. मगोचे ते व्यवस्थापकीय समिती सदस्यही होते. त्यावेळी बोलताना त्यांनी, कोविड काळात जेव्हा भाजप घोटाळय़ांमध्ये व्यस्त होता आणि काँग्रेस कुठेच दिसत नव्हती, तेव्हा आप हा एकमेव पक्ष होता ज्याने लोकांची मदत केली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे ’व्हिजन’ हे गोव्यासाठी एक नवीन आशा आहे. त्यांनी राज्याला दिलेल्या सहा आश्वासनांचा सर्वसामान्यांना फायदा होईल आणि ते ’आप’च्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दहा लाख रुपयांची बचत करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला.
गोमंतकीय नव्या बदलाच्या प्रतीक्षेत
शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गोव्यात नाराजी आहे. त्यामुळे लोक बदल आणि त्यांच्या सुधारणेसाठी काम करणारे सरकार शोधत आहे, असे दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी सांगितले.
आप नेते त्यांच्या सहा हमीसह लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांच्या प्रचारात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पक्षाला गोवेकरांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे, असे स्मिता शेट यांनी सांगितले.