प्रतिनिधी/ काणकोण
भारतीय जनता पक्षाने काणकोण मतदारसंघातील उमेदवारी माजी मंत्री रमेश तवडकर यांना दिल्यानंतर इजिदोर फर्नांडिस यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा आणि उपसभापतीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी सध्या अपक्ष म्हणून लढण्याच्या दृष्टीने प्रचारावर जोर दिला आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर भाजपात प्रवेश केलेल्या फर्नांडिस यांनी, या मतदारसंघात अनेक विकासकामांना आपण चालना दिली, मात्र उमेदवारी देताना आपल्यावर अन्याय करण्यात आला, असे मत व्यक्त केलेले आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे लोलये येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीच्या वेळी त्यांनी जाहीर केले आणि 22 पासून प्रत्यक्ष कामाला त्यांनी प्रारंभ केला आहे.
2017 च्या निवडणुकीपूर्वी फर्नांडिस यांनी काणकोण मतदारसंघातील प्रत्येक घराला स्वतः भेट दिली होती. आता परत एकदा त्यांनी दुचाकी घेऊन घर चलो अभियान सुरू केले आहे. यावेळी आपल्याला विशेष परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. आपल्या कामाची पद्धत या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला ठाऊक आहे. जे दिवस शिल्लक आहेत त्या दिवसांत अधिकाधिक लोकांच्या आपण भेटी घेणार आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.