प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनावर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार असणाऱया मराठा मंदिर ट्रस्टच्यावतीने बेळगावमधील गरजुंसाठी 10 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी बोलताना मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मराठा मंदिर समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. बेळगावमध्ये उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचे वारंवार दिसून येत असल्याने मराठा मंदिर ट्रस्टच्यावतीने बेळगावकरांसाठी हे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. गरजू व्यक्तींना हे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब काकतकर म्हणाले, सध्याच्या अवघड परिस्थितीतही मालू बंधूंनीही सामाजिक बांधिलकी राखत नागरिकांना हे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरच्या नावाखाली काही ठिकाणी लुटालूट सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अल्प दरात ऑक्सिजन सिलिंडर मिळावा यासाठीचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
गरजुंनी आप्पासाहेब गुरव-9480422522 किंवा बाळासाहेब काकतकर 98806 77762 या क्रमांकाशी संपर्क साधावयाचा आहे. या कार्यक्रमावेळी अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, सेपेटरी बाळासाहेब काकतकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य नागेश झंगरुचे, नेमीनाथ कंग्राळकर, लक्ष्मणराव सैनुचे, लक्ष्मणराव होनगेकर, चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, विश्वास घोरपडे, शिवाजी हंगिरगेकर, सुयश इंजिनियरिंगचे मालू ब्रदर्स, मराठा मंदिरचे कर्मचारी ढोबळे, दिनकर घोरपडे, अनिल बिर्जे यासह इतर उपस्थित होते.