युएईमध्ये उर्वरित टप्पा रविवारपासून, विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स यांच्या लढतीसह नवी सुरुवात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा उर्वरित टप्पा रविवार दि. 19 पासून खेळवला जाणार असून या उर्वरित टप्प्यातील सामन्यांसाठी प्रेक्षकांना मर्यादित प्रमाणात प्रवेश देणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. यापूर्वी मे महिन्यात आयोजित पहिल्या टप्प्यात कोव्हिड-19 चा शिरकाव झाल्यानंतर उर्वरित सामने अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकले गेले होते. रविवारी विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उर्वरित टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल.
‘प्रदीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये चाहत्यांना मर्यादित प्रमाणात का होईना, पण, प्रवेश दिला जाणार असल्याने ही लढत खास स्वरुपाची असेल. कोव्हिड-19 मुळे अनेक निर्बंध लादले गेले असल्याने यापूर्वी रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळवावे लागले. पण, आता काही प्रमाणात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, यासाठी पूर्ण लसीकरणाची अट असेल आणि चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्हॅक्सिनेशन स्टेटस दाखवावे लागेल’, असे आयपीएल कार्यकारिणीने पत्रकातून नमूद केले.
2019 नंतर प्रथमच
‘उर्वरित टप्प्यातील सामने दुबई, शारजाह व अबु धाबी येथे खेळवले जाणार असून यावेळी कोव्हिड प्रोटोकॉल व युएई प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे यात नमूद आहे. चाहत्यांच्या उपस्थितीत आयपीएलचे सामने खेळवले जाण्याची ही 2019 नंतरची पहिलीच वेळ असेल.
मागील वर्षी गर्भश्रीमंत मानल्या जाणाऱया आयपीएलचे सामने युएईमध्ये बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवले गेले होते. त्यानंतर 2021 आवृत्तीतील काही सामने कडक बायो-बबलमध्ये देशभरातील विविध ठिकाणी संपन्न झाले. यंदा किती प्रमाणात चाहत्यांना प्रवेश दिला जाणार, हे आयोजकांनी स्पष्ट केले नसले तरी स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के प्रवेश दिला जाऊ शकतो, असे संकेत आहेत.
‘उर्वरित आयपीएलच्या सर्व सामन्यांची तिकिटे आजपासून (गुरुवार दि. 16) www.iplt20.com या अधिकृत वेबसाईटवर, त्याचप्रमाणे platinumList.net या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील’, असे लीग आयोजकांनी म्हटले आहे. गतवर्षी कोरोनामुळे जवळपास पूर्ण ठप्प झालेले क्रीडाविश्व बायो-बबलमध्ये आयोजित काही सामन्यांच्या माध्यमातून पूर्वपदावर येण्यास यापूर्वीच सुरुवात झाली. मागील नोव्हेंबर ते यंदाच्या जानेवारीपर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेने महत्त्वाचा टप्पा पार पडला.
गतवर्षीच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड महिला संघातही मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळवली गेली. यंदा इंग्लंडचा भारत दौरा संपन्न झाला, त्यावेळी चेन्नई व अहमदाबादमधील सामन्यात चाहत्यांना काही प्रमाणात प्रवेश दिला गेला होता. मात्र, नंतर कोरोनाचा संसर्ग वाढत राहिल्याने पुन्हा त्याला ब्रेक देण्यात आला.
2021 बिग बॅश लीग, इंग्लिश भूमीतील न्यूझीलंड, भारताविरुद्ध मालिका, साऊदम्प्टनमधील वर्ल्ड टेस्ट फायनल, द हंड्रेड टुर्नामेंट या सर्व स्पर्धा चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही प्रेक्षक क्षमतेच्या प्रमाणात 50 टक्के चाहत्यांच्या हजेरीत सामने खेळवले गेले आहेत.
यंदा आयपीएल संपन्न झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरात व ओमानमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धाही खेळवली जाणार असून आयपीएल फायनलनंतर अवघ्या दोनच दिवसांच्या अंतराने विश्वचषकाला सुरुवात होईल.
(ग्लेन मॅक्सवेल)
आयपीएल म्हणजे वर्ल्डकपची रंगीत तालीम ः मॅक्सवेल
यंदा आयपीएल उर्वरित टप्प्यातील सामने खेळवले जातील, त्यावेळी ही एक प्रकारे टी-20 वर्ल्डकपची रंगीत तालीमच असणार आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने केले. आयपीएल स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे प्रतिनिधीत्व करेल.
आयपीएलचा उर्वरित टप्पा दि. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून त्यानंतर दोनच दिवसांच्या अंतराने दि. 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.
‘प्रत्यक्ष स्पर्धेत कोणत्याही देशाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळू शकणार नाही. मात्र, आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जातील, त्यावेळी सर्व खेळाडूंना सरावाची ही उत्तम संधी असणार आहे’, याचा मॅक्सवेलने पुढे उल्लेख केला. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच व पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाचे काही दिग्गज खेळाडू मागील बऱयाच महिन्यांपासून व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाहीत. ते या आयपीएलच्या माध्यमातून आपला फॉर्म आजमावून पाहतील.
यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा विद्यमान विजेते विंडीज, जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यासह कठीण गटात समावेश आहे.
(नॅथन इलिस)
आयपीएल पदार्पणासाठी नॅथन इलिस महत्त्वाकांक्षी
ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज नॅथन इलिस यंदा प्रथमच आयपीएल स्पर्धेत खेळणार असून आपल्या पदार्पणाच्या मोहिमेत संघसहकारी शमीकडून काही धडे आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. याशिवाय, संधी मिळाल्यास बुमराहशी देखील संवाद साधणार असल्याचे त्याने म्हटले आहे. इलिसला पंजाब किंग्स संघात सहकारी ऑस्ट्रेलियन गोलंदाज रिले मेरेडिथऐवजी स्थान दिले गेले आहे.
अवघ्या 24 महिन्यातच क्लब क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास करणारा नॅथन इलिस बांगलादेशविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच हॅट्ट्रिक नोंदवल्याने विशेष प्रकाशझोतात आला होता. ‘आता आयपीएलच्या माध्यमातून गोलंदाजीत आणखी वैविध्य आणण्याचा प्रयत्न असेल,’ असे त्याने म्हटले आहे. इलिसचा टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघात राखीव खेळाडू या नात्याने समावेश आहे.