क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हरियाणा येथे कुराश असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय कुराश स्पर्धेत बेळगावची सुकन्या मलप्रभा जाधव हिने सुवर्णपदक जिंकले. तिने 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत पंजाबच्या परमिंदर कौरचा पराभव करत हे सुयश प्राप्त केले. दुखापतीतून सावरत पुनरागमन केल्यानंतर तिने मिळवलेले हे यश विशेष लक्षवेधी ठरले.
या स्पर्धेतील सुवर्ण जिंकल्यानंतर ताजिकिस्तानमध्ये होणाऱया आशिया कुराश आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली. हरियाणातील स्पर्धेत तिने पहिल्या फेरीत हिमाचल प्रदेशच्या ओमानीचा पराभव केला. नंतर दुसऱया सामन्यात पंजाबच्या समिता कौर हिचा तर तिसऱया सामन्यात दिल्लीच्या रुचा शमीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत तिने उत्तर प्रदेशच्या राणीला धक्का देत जेतेपदाच्या लढतीतील आपले स्थान निश्चित केले. पुढे अंतिम फेरीत तिने परमिंदरला नमवले.
मलप्रभाला प्रशिक्षक त्रिवेणी सिंग, जितेंद्र सिंग व फिटनेस प्रशिक्षक ओमकार मोटार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.