ऑनलाईन टीम / मुंबई :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी केला होता. मलिक यांनी फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांचे दोन वेगवेगळे फोटो ट्विट केले होते. त्यामध्ये असलेला व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले. मलिकांनी लवंगी लावली, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. लवकरच मलिकांचे अंडरवर्ल्डसोबतचे संबंध पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी माझा संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. हे आरोप त्यांनी कोणत्या मानसिकतेतून केले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी लवंगी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. लवकरच मी ते पुराव्यानिशी उघड करणार आहे. हे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे, असेही ते म्हणाले.