वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल नरसिंग यादव हा सर्बियात होणाऱया आगामी विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय मल्लांची कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना चाचणीत नरसिंग यादव निगेटिव्ह ठरल्याने त्याला संघटनेकडून सर्बियातील स्पर्धेसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
नरसिंग यादववर यापूर्वी चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याला तब्बल चार वर्षे कुस्ती क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. आता पहिल्यांदाच त्याचे स्पर्धात्मक कुस्ती क्षेत्रात पुनरागमन होत आहे. सर्बियातील विश्व कुस्ती स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय कुस्ती संघामध्ये नरसिंग यादवच्या सहभागाविषयी शंका असल्याने जितेंद्र किन्हाला 74 किलो वजन गटात निवडण्यात आले होते. पण कोरोना चाचणीत नरसिंग यादव निगेटिव्ह ठरल्याने आता किन्हाच्या जागी नरसिंग यादवला संधी मिळणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
14 डिसेंबरला भारतीय पुरुष फ्रि स्टाईल कुस्ती संघासमवेत नरसिंग यादव बेलग्रेडला प्रयाण करणार आहे. भारताच्या बऱयाच अव्वल मल्लांनी सर्बियातील या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निणंय घेतला आहे. बजरंग पुनिया तसेच विनेश फोगट या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. टोकियो ऑलिम्पिकसाठी 74 किलो गटातून अद्याप भारतीय कोटामधील मल्ल निश्चित झालेला नाही. नरसिंग यादवच्या पुनरागमनामुळे आता या गटात ऑलिम्पिकसाठी जितेंद्र कुमार, नरसिंग यादव आणि सुशीलकुमार या तीन मल्लांमध्ये पात्रतेची चुरस राहील.