प्रतिनिधी / मसुरे:
मसुरे देऊळवाडा-बागायत या मुख्य रस्त्यावर देऊळवाडा येथे दरड कोसळून भला मोठा दगड भर रस्त्यावर आला होता. हा दगड मागील वीस दिवसांपासून अपघाताला आमंत्रण देत होता. दरम्यान, हा दगड गुरुवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आला. अति पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यालगतच्या डोंगरातून घरंगळत आलेला भला मोठा जांभा दगड रस्त्यावर येऊन थांबला होता. या रस्त्याच्या खालच्या बाजूने मनुष्य वस्ती असल्याने तातडीने उपाययोजना होणे आवश्यक होते. परंतु कोणत्याही उपाययोजना न झाल्याने अनेक वाहन चालकांना हा दगड जीवघेणा ठरत होता. गुरुवारी सकाळी मसुरे पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी पाहणी केली. जायभाय यांनी जेसीबी मालक सागर महेश बागवे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हा दगड बाजूला करण्यात आला. यावेळी सागर बागवे, राहुल बागवे, विनय परब, संजय सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हा दगड रस्त्यातून बाजूला हटविल्याबद्दल वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.