लखनौ / वृत्तसंस्था
प्रयागराज येथील आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या कथित आत्महत्येच्या संदर्भात आनंद गिरी याला अटक करण्यात आली आहे. हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती प्रयागराज पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास दलाची स्थापना करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गेल्या सोमवारी आखाडा परिषदेच्या कार्यालयात सापडला होता. एक सात पानी आत्महत्या पत्रही सापडले होते. त्याच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे.
मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप नरेंद्र गिरी यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. नरेंद्र गिरींना लिहिण्याचा अजिबात सराव नव्हता. अशा स्थितीत त्यांनी सात पानी आत्महत्या पत्र लिहून ठेवले हे संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची कसून चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.
कोटय़वधींची संपत्ती
आखाडा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने गिरी यांच्याकडे कोटय़वधी रुपयांच्या संपत्तीचा ताबा होता. या संपत्तीच्या मोहापोटी त्यांची हत्या झाली असावी. तसेच ती त्यांच्या जवळच्यांपैकी कोणीतरी केली असावी असाही संशय व्यक्त होत आहे. आम्ही सर्व शक्यता गृहित धरुन ही चौकशी करीत आहोत, असे विशेष तपास दलाच्या अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आज अंत्यसंस्कार
महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिव देहावर आज बुधवारी प्रयागराज येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गिरी यांच्या निधनासंदर्भात देशभरातील प्रतिक्रिया येत आहेत. आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन त्यांनी स्पृहणीय कार्य केले होते, अशी त्यांची प्रशंसा त्यांच्या अनेक भक्तांनी केली आहे.