भारत बायोटेकने दिली आनंदवार्ता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असून याला चांगले यशही मिळत आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसींच्या उपलब्धतेवर सरकारचा भर आहे. याचदरम्यान भारत बायोटेककडून आनंदाची बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन सुमारे 2 कोटी डोसने वाढविणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच मुलांवरील लसीच्या परीक्षणाबद्दल मोठी घोषणा केली आहे.
भारत बायोटेक सध्या कोव्हॅक्सिनचे दर महिन्याला साडेतीन कोटी डोस तयार करत आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन साडेपाच कोटी डोसपर्यंत पोहोचविण्याची योजना असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सर्वाधिक प्रभाव मुलांवर पडण्याच्या भीतीदरम्यान कंपनीकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. मुलांवरील लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेक कंपनी मुलांवरील परीक्षणाचा डाटा पुढील आठवडय़ात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) सादर करणार आहे.
तर फायजर कंपनीने स्वतःची लस 5-11 वयोगटातील मुलांवर प्रभावी असल्याचा दावा केला होता. फायजर कंपनीने 5-11 वयोगटातील मुलांवर लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. भारतात अद्याप मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही.