चालकासह पाचजण अटकेत
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथून बेकायदेशीररित्या सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक होणार असल्याची कुणकुण लागताच महाड पोलिसांनी सापळा रचला. या सापळ्य़ात महाड पोलिसांनी 37 लाख 52 हजार रुपये किंमतीचे सोने महाड पोलिसांनी जप्त करत चालकासह 5 जणांना अटक केली. सोने तस्करीचे चिपळूण कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
झायलो कार चालक हेमंत पवार याच्यासह अशरफ फारुक शेख, समीर श्रीकांत भूनिया, गोपाळ बंकिम हजरा, राजकुमार सतीश मंडळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. महाड पोलिसांनी नाकाबंदीत ही कारवाई केली. चिपळूण येथून बेकायदेशीररित्या सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती महाड पोलिसांना मिळाल्यानंतर टोळ फाटा येथे नाकाबंदी केली. या दरम्यान झायलो गाडीतून प्रवास करणाऱया चारजणांकडे 891.549 ग्रॅम सोने आढळले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस हवालदार प्रवीण राठोड, हवालदार किशोर भुसे, अब्बास शेख यांनी केली, अधिक तपास महाड पोलीस करत आहेत.